मुंबई : पावसाळ्यातील वातावरण हे सतत बदलत असते. हे वातावरण कधी ओले असते, शिवाय कधी आर्द्र तर कधी कोरडे, तर कधी थंड असते. त्यामुळे संसर्गाच्या वाढीसाठी हे वातावरण अगदी पोषक ठरत असते. पावसाळ्यात ४ ते १६ वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये ओटिटिस मीडिया सारख्या कानाच्या संसर्गास तर २४-६५ वयोगटातील प्रौढांमध्ये घशाचा संसर्गांचे प्रमाण वाढल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
दमट हवामानात जीवाणु मोठ्या प्रमाणात पसरत असल्यामुळे ते जीवाणूजन्य संक्रमणाला आमंत्रण देतात. ज्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि सीझनल एलर्जी होऊ शकते. पावसाळ्याच्या दिवसात कान, नाक आणि घशासंबंधीत तक्रारी वाढतात. वाढलेली आर्द्रता, तापमानातील चढउतार हे संसर्गास कारणीभूत ठरतात. ४ ते १५ वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे त्यांना अशा संसर्गाचा धोका अधिक असतो. डे केअर आणि शाळकरी मुलांमध्ये संसर्ग पसरण्याचे प्रमाण देखील इतर वयोगटातील व्यक्तींच्या तुलनेने अधिक असते, असे ठाण्यातील डॉक्टर परग देशपांडे यांनी सांगितले.त्यामुळे पावसाचे पाणी तुमच्या कानात जाणार नाही याची खबरदारी घ्या, आपले कान कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा. धुळीच्या किंवा बुरशीजन्य वातावरणाचा संपर्क टाळा असेही डॉ देशपांडे म्हणाले.







