वृत्तसंस्था : भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
बुद्धिबळ विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या टायब्रेकर सामन्यात भारताचा युवा ग्रँडमास्टर प्रज्ञानंद जगातील नंबर-1 खेळाडू कार्लसनच्या मागे पडला. यानंतर दोघांमधील फायनल स्कोअर कार्लसन १.५ तर प्रज्ञानंदसाठी ०.५ असा राहिला होता. या सामन्यात १८ चालीनंतर क्वीन्स बदलण्यात आल्या, पण त्याचा फायदा कार्लसनला मिळाला.टायब्रेकर सामन्यात दोन्ही खेळाडूंना २५-२५ मिनिटे मिळतात. त्याचबरोबर प्रत्येक चालीनंतर, खेळाडूच्या वेळेत १० सेकंद जोडले जातात. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पहिल्या २ सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पहिला सामना २२ ऑगस्ट रोजी झाला होता. यामध्ये प्रज्ञानंदने पांढऱ्या आणि कार्लसनने काळ्या मोहऱ्यांसह हा सामना खेळला, त्यानंतर ३५ चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी हातमिळवणी केली आणि सामना अनिर्णित राहिला.
आर प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यातील दुसरा क्लासिकल सामना २३ ऑगस्ट रोजी खेळला गेला. यामध्ये कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांसह तर प्रज्ञानंद काळ्या मोहऱ्यांसह खेळला. या सामन्यातही दोन्ही खेळाडूंनी कोणतीही घाई दाखवली नाही आणि अखेर हा सामनाही अनिर्णित राहिला. ३० चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करून सामना संपवला. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील प्रज्ञानंद हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. बुद्धिबळ विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत मॅग्नस कार्लसनने अझरबैजानच्या निझात अब्बासोव्हचा १.५-०.५ ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याचबरोबर भारताच्या आर प्रज्ञानंधाने अमेरिकेचा अनुभवी ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाचा ३.५-२.५ असा पराभव केला होता. २००२ नंतर प्रथमच, बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असला, तरी विजेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिलेले भारतीय.