पुणे : आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची येत्या ३० ऑगस्ट आणि १ सप्टेबरला बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची देशभर घौडदौड देशभर सुरू असताना आणि मुंबईतील बैठकीच्या सहा दिवसाआधीच सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत, मला माहिती नाही, राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात पुण्यात भेट झाली होती तेव्हा ही बैठक गुप्त असल्याची चर्चा बरीच रंगली होती, याबाबत विचारले असता यावर चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल, असा सवालही त्यांनी केला. भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले. यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. असा मोठा गोप्यस्फोटही त्यांनी केला. भाजपने अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न केले. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.





