पुणे : नवले पूल परिसरात होत असलेल्या अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहनांचा वेग मर्यादित रहावा, यासाठी ‘रम्बल स्टिप’ बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रस्त्यावर प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर चांगल्या दर्जाच्या रम्बल स्टिप बसविण्यात येणार आहेत. यामुळे या भागात होणाऱ्या अपघातांना आळा बसेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला.
नवले पुलावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये आठ जणांना मृत्यू झाला होता. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून आणि ब्रेक नादुरुस्त झाल्याने नवले पुलाजवळ गुरुवारी भीषण अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर या भागातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर तीव्र स्वरूपाचा उतार असल्याने प्रत्येक महिना-दोन महिन्यांनी या रस्त्यावर अपघात होतात. काही महिन्यांपूर्वी नवले पूलाजवळ झालेल्या अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता. नवले पूलाजवळ असलेल्या तीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे बहुतांश अपघात होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर पाचशे मिटर अंतरावर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी रम्बल स्ट्रिप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.







