मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि मनसे कार्यकर्त्यांकडून कथितपणे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली असून, यामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपाध्याय म्हणाले की, हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून बिगर-मराठी नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांविरोधात त्यांनी यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी पाठवलेल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. अनेकदा तक्रार करूनही एफआयआर दाखल न झाल्यामुळे अखेर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेमुळे हिंदी-मराठी भाषिक तणावास पुन्हा एकदा राजकीय आणि न्यायालयीन वळण मिळण्याची शक्यता आहे. “राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या नावाखाली बिगर-मराठी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे, त्यांचे चुलत भाऊ आणि शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या विजय रॅलीचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच, राज ठाकरे यांनी बिगर-मराठी भाषिकांना मारहाण करण्याचे समर्थन केले आहे. असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी राजकीय फायद्यासाठी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला आहे जेणेकरून त्याचा वापर आगामी बीएमसी निवडणुकीत करता येईल, असा दावा याचिकाकर्त्याने त्यांच्या याचिकेत केला आहे.







