नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलीय. नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवण्यासाठी नियमभंग केल्याचा आरोप करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती. गडकरी यांची खासदारकी रद्द करा आणि पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी या याचिकेत केली आहे. या याचिकेसंदर्भात नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावलीय. नितीन गडकरी २०१४ पासून नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरीं विरोधात काँग्रेसनं विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. गडकरींना या निवडणुकीत सहा लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. तर विरोधी उमेदवाराला ४ लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली. गडकरींनी या निवडणुकीत सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. नितीन गडकरींच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयावर विरोधी उमेदवाराने आक्षेप घेत याचिका दाखल केलीय. बहुजन स्वराज पक्षाचे उमेदवार एडवोकेट सूरज मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेनुसार १९ एप्रिलला नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. या दिवशी मतदान केंद्रावर गडकरींच्या कार्यकर्त्यांना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सूरज मिश्रा यांनी केलाय. मतदारांना विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदान केंद्राची माहिती देणारी चिठ्ठी देण्यात येत होती. यावर गडकरींचा फोटो होता.
नियमानुसार मतदान केंद्र परिसरात उमेदवाराचे नाव असलेल्या चिठ्ठया देता येत नाहीत. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. तरीही काही कारवाई झाली नाही. शेवटी याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी याचिकेत केली आहे. तसंच निवडणुकीचा निकाल रद्द करावा आणि पुन्हा निवडणूक घ्या अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह इतरांना या याचिकेतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. तर नितीन गडकरी यांना नोटीस बजावली आहे. तीन आठवड्यात या प्रकरणी भूमिका स्पष्ट करा असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी नाताळच्या सुट्टीनंतर होणार आहे.





