मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे (शिंदे गटा) नेते रवींद्र वायकर यांची खासदारकी कायम राहणार आहे. त्यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. कीर्तीकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्या वतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला. तसेच, कीर्तीकर यांची याचिका फेटाळली.
दरम्यान, मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान १२० टेंडर मते गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ टेंडर मते होती. त्यापैकी १२० टेंडर मते मोजली गेली नाहीत. टेंडर मतांच्या फेरमोजणीची विनंती केली होती, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा, कीर्तीकर यांच्यातर्फे युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. तसेच, मतमोजणी केंद्रात भ्रमणध्वनीचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन, तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही कीर्तीकर यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे, टेंडर मते ही या मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचा दावाही कीर्तीकर यांच्यातर्फे करण्यात आला होता.





