मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिकेने अभिनव कार्यप्रणाली सुरू केली असून त्याची सुरूवात २ मेपासून केली जाणार आहे. महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सर्व दवाखान्यांमध्ये आधुनिक पद्धतीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस – २) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरणार आहे. तसेच, यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाइलवरच उपचारांच्या सर्व नोंदी मिळणे शक्य होणार आहे.
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली एचएमआयएस – २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबंधित यंत्रासामुग्री देण्यात आली आहे. तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी रुग्णांच्या नोंदी कागदावर (पेपर) केल्या जात होत्या. मागील सहा महीने एचएमआयएस – २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली आहे. येत्या २ मेपासून ही प्रणाली १७७ दवाखान्यात कार्यान्वित केली जात आहे. तसेच, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथेही ३० मेपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे.







