पिंपरी : भागीदारी मध्ये व्यवसाय करण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका व्यक्तीकडून ४८ लाख २१ हजार रुपये घेत फसवणूक केली. ही घटना १८ जानेवारी २०२१ ते १ एप्रिल २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली. ऋषिकेश शिवाजी हिवरकर (३१, वराळे, मावळ) यांनी याप्रकरणी २८ एप्रिल २०२५ रोजी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वासुदेव उर्फ लक्ष्मण कल्याण पिसाळ, दैवशाला वासुदेव पिसाळ (दोघे रा. डुडुळगाव, हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून ऋषिकेश यांना भागीदारीत पाईन वूड खरेदी-विक्री व उत्पादन हा व्यवसाय करण्याचे आश्वासन दिले. ऋषिकेश यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी गोल्डन टिंबर्स या नावाने फर्म रजिस्टर केली. यामध्ये ऋषिकेश यांचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यानंतर फर्मचे बँक खाते सुरु केले. ऋषिकेश यांच्याकडून व्यवसायासाठी एकूण ४८ लाख २१ हजार ५०० रुपये घेत त्यांची फसवणूक केली.







