पुणे : लोहगाव येथील पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन बाळगणाऱ्या चौघा प्रवाशांकडून दीड कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पुण्याहून दुबईला निघालेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नऊ लाख २२ हजार रुपयांचे दिरहम जप्त करण्यात आले. त्यानंतर कस्टमच्या पथकाने आणखी एक कारवाई केली.
या कारवाईत तिघांंना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक कोटी ४१ लाख ११ हजार ७२८ रुपये किंमतीचे दिरहम जप्त करण्यात आले. चौघा प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त परकीय चलन बाळगल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणाचा कस्टमकडून तपास करण्यात येत आहे.