पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाडी उभी करण्याच्या वादातून संतप्त झालेल्या व्यक्तीने लोखंडी रॉडने पाच जणांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना ब्राह्मणवाडी साते (ता. मावळ) येथे घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शंकर शिंदे (वय ३७, रा. ब्राह्मणवाडी साते) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घरासमोरील जागेत कोणाच्या परवानगीने गाडी लावली, यावरून वाद निर्माण झाला. या वादात फिर्यादीचे नातेवाईक दाजी दत्तात्रय भानुसघरे व सिद्धेश यांच्याशी आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली व लोखंडी रॉडने मारहाण केली. या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विजय शिंदे यांना देखील आरोपीने डोक्यात रॉडने मारून गंभीर दुखापत केली. त्यांच्यासोबतच त्यांच्या आई हौसाबाई शिंदे व पत्नी रुपाली शिंदे यांना देखील आरोपीने शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर, वादाविषयी विचारणा करणाऱ्या विजय यांचे मेहुणे रुपेश भरत पिपरकर यालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार वायळ पुढील तपास करत आहेत.