मुंबई : मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. त्यानुसार पाच कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले असून या सर्व कंपन्या भारतीय असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धूळ प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना करत आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी वॉर्डस्तरावर केली जात आहे. मात्र यावरच न थांबता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही चाचपणी पालिकेने सुरू केली असून इच्छुक कंपन्यांकडून ४ डिसेंबरपासून प्रस्ताव मागवण्यात आले होते. तर निविदा सादर करण्याची १४ डिसेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र ही मुदत २२ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानुसार पाच कंपन्यांनी यात स्वारस्य प्रस्ताव सादर केले असून लवकरच यातील एका कंपनीची निवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
यासाठी या कंपन्यांना निविदा सादर कराव्या लागणार आहेत. या सर्व भारतीय कंपन्या असून एकाही विदेशी कंपनीने यात स्वारस्य दाखवलेले नाही. यामध्ये गदग येथील एक, बंगळुरू येथील तीन, तसेच खारघरमधील एका कंपनीचा यात समावेश आहे. या प्रस्तावात स्वारस्य असलेल्या कंपन्यांची पाच वर्षांची उलाढाल असावी, तसेच कृत्रिम पाऊस पाडण्याचा किमान सात वर्षाचा अनुभव असावा यांसह अन्य अटी आखून देण्यात आल्या आहेत. मुंबई पालिकेकडून दुबईतील कृत्रिम पावसाचाही अभ्यास केला जाणार होता. मात्र याबाबतची माहिती उपलब्ध होत नसून त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याऐवजी सहा कंपन्यांपैकी एकाची निवड करून थेट कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न पालिकेचा आहे. तलावातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे २००९ मध्येही तलाव क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र तेव्हा हा प्रयोग अपयशी ठरला होता.