मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत पश्चिम व पूर्व उपनगरात अवैध मद्या वाहतुकीबद्दल २२६ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत २२७ जणांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ९२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीला दोन आठवडे शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे, असे उपनगर अधीक्षक नितीन घुले यांनी सांगितले. मुंबईत येणारे सर्व टोल नाके तसेच वांद्रे, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या ट्रेनमधून अवैध मद्या वाहतूक केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन गस्त वाढविण्यात आली आहे. रेल्वेगाडीतून येणारी पार्सल, ऐवजाचीही नियमित तपासणी करण्याची विनंती रेल्वे व्यवस्थापकांना करण्यात आली आहे.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडून आढावा घेतला जात आहे. याशिवाय उपनगरातील २६ मतदारसंघात निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अवैध मद्याविरोधात कारवाई करण्यासाठी १६ भरारी पथकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत. १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत दारुबंदी कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, अवैध मद्या, विदेश मद्याचा साठा व वाहतूक आदींचा समावेश आहे. या कारवाईत १४ वाहनेही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार ५६ सराईत गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव उपायुक्तांना सादर करण्यात आले आहेत. अवैध मद्यानिर्मिती, वाहतूक, साठा वा विक्री याबाबत तक्रार करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रण कक्ष २४ तास उपलब्ध करून देण्यात आला आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ उपलब्ध करून देण्यात आला आहे.