मुंबई : ऑनलाइन मागविलेल्या मोबाईल बाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ग्राहकसेवा प्रतिनिधीऐवजी तो कॉल ठगाला लागला. यामध्ये नौदल कर्मचाऱ्याची ४९ हजार रुपयांना फसवणूक झाली असून, घाटकोपर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
नौदल डेपोमधील कर्मचाऱ्याच्या तक्रारीनुसार, २१ जुलैला त्यांनी फ्लिपकार्टवरून मोबाइल बुक केला. मात्र, मोबाइल वेळेत न आल्याने चौकशीसाठी गुगलवरून फ्लिपकार्टच्या ग्राहकसेवा प्रतिनिधीचा नंबर मिळविला. संबंधित क्रमांकावर संपर्क साधताच त्याने सर्व माहिती घेतली. त्यानंतर, व्हिडीओ कॉल करून यूपीआय आयडीमध्ये त्याचा यूपीआयडी भरण्यास सांगून ४९९८७ हा क्रमांक भरण्यास सांगितला. हा क्रमांक टाकताच त्याच्या बँक खात्यातून तेवढी रक्कम डेबिट झाल्याचा संदेश आला. कर्मचाऱ्याने संबंधिताकडे चौकशी केली. तेव्हा, कॉलधारकाने पुन्हा व्हिडीओ कॉल करण्यास सांगताच त्याला संशय आला. अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. गुगलच्या ‘एडिट अँड सजेस्ट’च्या पर्यायामुळे ही फसवणूक झाली आहे. सायबर भामट्याने ग्राहकसेवा प्रतिनिधी म्हणून स्वतःचा क्रमांक टाकून गंडविले आहे.