पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी चिंचवड शाखेने गोवा पोलिसांच्या सहाय्याने राज्यात जाऊन बनावट दारू बनवणारा कारखाना उध्वस्त केला आहे. तसेच गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरीत्या बनावट देशी दारूची तस्करी करणाऱ्या ट्रकवर देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलीये. पिंपरी चिंचवड शहरातील मामुर्डी या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका ट्रकमधील ९० मिलीलिटरच्या ६० हजार बाटल्या जप्त केल्या आहेत.
या साठ्यामध्ये जवळपास २१ लाख रुपये किंमतीच्या बनावट दारू असलेल्या बाटल्या देखील राज्य उत्पादन विभागाने जप्त केल्यात. तसेच गोव्याच्या ज्या ठिकाणी बनावट देशी दारू बनवली जाते, त्या ठिकाणी जाऊन देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. गोव्यात केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारू तयार करण्यासाठी एक लाख ३४ हजार ९८५ लागणारं साहित्य जप्त केलं आहे. तसेच या प्रकरणात झुल्फीखार ताज आली चौधरी आणि अमित ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींना अटक केली असून अन्य दोन आरोपी अजूनही फरार आहेत.