मुंबई : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षांच्या प्रेयसीचे अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याच आईकडून प्रियकराने ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार घाटकोपर परिसरात घडला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीने विश्वासाने पाठवलेल्या छायाचित्रांचा आरोपीने गैरवापर करून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. ३९ वर्षांची तक्रारदार महिला पती आणि तीन मुलांसह घाटकोपर परिसरात वास्तव्यास आहे. महिलेची मुलगी आरोपीच्या संपर्कात होती. गेल्या वर्षी मे महिन्यांत आरोपीने तरुणीच्या आईला दूरध्वनी करून जागृतीनगर मेट्रो स्थानकात बोलावले. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी तेथे गेली. आपले तिच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असून तिची काही खासगी छायाचित्रे आपल्या मोबाइलमध्ये आहेत, असे सांगून त्याने ती छायाचित्रे समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली.
तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला तिच्या मुलीची काही अश्लील छायाचित्रे दाखविली. यावेळी तिने त्याला छायाचित्रे डिलीट करण्याची विनंती केली. मात्र त्याने छायाचित्रे डिलीट करण्यास नकार देऊन तिच्याकडे पैशांची मागणी केली. ५० हजार रुपये दिले नाहीत तर तिच्या मुलीची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर वायरल करून तिची बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. त्यामुळे तिने ५० हजार रुपये जमवून आरोपीला दिले. पैसे मिळाल्यानंतर त्याने तिच्या मुलीची छायाचित्रे डिलीट करतो असे सांगून तेथून पलायन केले. हा प्रकार कोणाला सांगितला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, अशीही धमकीही त्याने तेथून जाताना महिलेला दिली. मुलीच्या बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र ५० हजार रुपये दिल्यानंतरही तो तिच्या मुलीचा सतत पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. आरोपीपासून मुलीसह कुटुंबियांना धोका असल्याचे लक्षात घेऊन महिलेने हा प्रकार घाटकोपर पोलिसांना सांगून आरोपी विरोधात तक्रार केली. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश संबंधित पोलिसांना दिले. या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी घाटकोपर पोलीस अधिक तपास करीत असून आरोपीचा शोध सुरू आहे.