उल्हासनगर : पर्यावरण संरक्षण, ध्वनी प्रदूषणविरोधी लढा देणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकील सरिता खानचंदानी (५१) यांनी २८ ऑगस्ट रोजी उल्हासनगर ४ येथील रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवत पाच जणांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आली.
उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पुरुषोत्तम खानचंदानी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सरिता खानचंदानी यांचा त्यांच्या ओळखीतील जिया गोपलाणी व इतरांनी वारंवार मानसिक छळ केला होता. आत्महत्येपूर्वी सरितांनी आपल्या कॅबिनमध्ये लिहून ठेवलेल्या चिट्ठीत जिया गोपलाणी, उल्हास फाळके, शिवाणी शुक्ला फाळके, राज चांदवाणी आणि धनंजय बोडारे मृत्यूस कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती प्रथम खबर अहवाल अर्थात दाखल गुन्ह्यात नमूद करण्यात आली आहे. सरिता खानचंदानी या वकील व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून राज्यभर परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूने उल्हासनगरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर पुरुषोत्तम खानचंदानी यांच्या तक्रारीनुसार पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.







