नवी दिल्ली : मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देण्यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना भारत निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंगभवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे आणि अरुण गोयल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. देशभरात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये विशेषत: २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठया प्रमाणात मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी श्री. तेंडुलकर यांच्या प्रभावाचा सकारात्मक लाभ होण्याच्या दिशेने त्यांचे ईसीआयचे ‘नॅशनल आयकॉन’ होणे अधिक महत्वाचे ठरेल.
श्री. तेंडुलकर म्हणाले की, भारतासारख्या उत्साहपूर्ण लोकशाहीसाठी तरुणांची राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका आहे. क्रीडा सामन्यादरम्यान देशाला प्रोत्साहन देताना, इंडिया..इंडिया असा जयघोष करणारी ‘टिम इंडिया’ समृद्ध लोकशाहीला पुढे नेण्यासाठी नक्कीच समोर येईल. त्यासाठी सर्वात सोपा पण सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मतदानाचा हक्क बजावणे. ज्याप्रमाणे एखादा सामना बघण्यासाठी स्टेडियमवर गर्दी जमते. त्याप्रमाणेच प्रत्येक निवडणुकीत मतदान केंद्रावरही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी आणि उत्साह कायम ठेवू या, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण मतदार निवडणुकीत सहभागी होणार, तेव्हाच आपला देश अधिक समृद्धतेच्या दिशेने वाटचाल करेल. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार याप्रसंगी म्हणाले की, सचिन तेंडुलकर भारताचेच नव्हे, तर जागतिक स्तरावरील आदणीय खेळाडू व्यक्तिमत्व आहे. त्यांची क्रिकेटची संपूर्ण कारकीर्द प्रशंसनीय आणि उल्लेखनीय राहिलेली आहे. यामुळेच ईसीआयने मतदारांची संख्या वाढविण्यासाठी ते एक आदर्श पर्याय ठरतील. या तीन वर्षांमध्ये विविध दूरचित्रवाणी वरील टॉक शो, कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमांद्वारे श्री. तेंडुलकर मतदारांमध्ये मतदानाविषयी प्रचार-प्रसार करतील. यामाध्यमातून मतदानाचे महत्व आणि देशाच्या भवितव्यासाठी ते किती महत्वाचे आहे हे मतदारांना पटवून सांगतील.
कार्यक्रमामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यामध्ये मतदानाचे महत्व या विषयावर नाटक सादर केले. यापूर्वी भारतीय निवडणुक आयोगाने विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी सुप्रसिद्ध अभिनेते आमीर खान, पंकज त्रिपाठी, खेळाडू मेरी कोम, एम.एस. धोनी यांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्त केले गेले आहेत.