नागपूर : राज्यातील राजकीय वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनाता पाहात आहे. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही एक उपमुख्यमंत्री डिनरला जात नाही. कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तिघेही कधी एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले की मुख्यमंत्री येत नाहीत. हे सर्व राज्यात चालले आहे. साधं जेवणासाठी बोलावल्यावरही ते एकत्र येत नाहीत याचा अर्थ सरकारमध्ये सारेकाही आलबेल नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची बदलणार आहे असे ठोस भाकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री असतात तेव्हा दोन पैकी एक उपमुख्यमंत्री नसतो. दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्र्यांनी भोजनाचं आवतन दिलं त्याला एका उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून महाराष्ट्रातील जनतेला सत्ताधाऱ्यांचं नाटक आणि तमाशा दिसत आहे. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची पत घालवली आहे, असा आरोप करत सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्यमंत्री बदलणार आहे असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, येणाऱ्या १५ ते २० दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबर मध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. पण मुख्य खुर्ची मात्र बदलेल. हे ठासून सांगतो, असा मोठा दावाच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.