मुंबई : मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत सक्त वसुली संचालनालयाने(ईडी) १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्यात १३ आरोपींच्या मुंबई व केरळतील कोची येथील ठिकाणांचा समावेश आहे.त्यात आरोपी व संबंधित व्यक्तींच्या मुंबईतील ठिकाणांचाही समावेश आहे. ईडीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी छापे टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले. महापालिका निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती डिनो मोरिया व त्याच्या भावाची मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली होती. याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीने मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मागील २० वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यातील अनेकांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाखांंचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा पोलिसांचे विशेष तपास पथक तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीनेही उडी घेतली असून या कथित गैरव्यवहारसंबंधी आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. त्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत.







