मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानावर छापा टाकल्यानंतर आता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले आहे. त्यांच्यासह एकूण सहा जणांना समन्स बजावले असून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. ईडीने याप्रकरणी मंगळवारी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
वसई – विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे टाकले. त्यावेळी नाशिक येथील त्यांच्या पुतण्याकडून एक कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर याबाबतच अधिक माहिती घेण्यासाठी ईडीने पवार यांना समन्स बजावले आहे. याप्रकरणी पवार यांच्यासह एकूण सहा जणांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. ते तीन वर्ष या पदावर कार्यरत होते. पालिकेच्या सभागृहात सोमवारी पवार यांचा छोटेखानी निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर मंगळवारी ईडी थेट त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली.







