मुंबई : वडिलांची देखभाल करण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय इसमाने (केअर टेकर) १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित तरुणी १६ वर्षांची आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरूणाला खिळले होते. वडिलांच्या देखभालीसाठी तिने महेश राजपूत (५६) याला केअर टेकर म्हणून नेमले होते. १ जूनपासून राजपूत पीडितेच्या घरी तिच्या वडिलांची देखभाल करण्यासाठी येत होता. तो पीडितेच्या घरीच रहात होता. या काळात तो सतत पीडित तरुणीला व्हॉटस ॲपवर मेसेज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पीडित तरुणी त्याला टाळत होती. दरम्यान, त्याने पीडिता घरात झोपली असताना तिच्याशी गैरवर्तन केले. याबाबत पीडितने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश राजपूतविरोधत विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (२), ७८ (२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमातील (पोक्सो) कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी हा मूळ बदलापूर येथे राहणार आहे. सध्या तो फरार असून आम्ही त्याचा शोध घेत आहोत, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.







