नवी मुंबई : गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या परेदशी नागरिकांविरोधात शुक्रवार दुपारपासून धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये व्हिसाची मुदत संपली आहे अशा सर्वाची झाडाझडती सुरू करण्यात आली. याप्रकरणी ७५ पेक्षा अधिक परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. व्हिसा मुदत संपल्यानंतरही नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या परदेशी व्यक्तींना शोधण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. विशेषत: वाशीतील जुहू गाव, जुहू गाव खाडी परिसर, बोनकोडे, खैरणे गाव, तसेच पनवेल आणि खारघर परिसरातील गावांत शोध सुरू आहे. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ७५ जणांना ताब्यात घेण्यात आले. या धाडसत्रात ६०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि जवानांनी भाग घेतला. आतापर्यंत ७५ परदेशी नागरिकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांचा अमली पदार्थाच्या तस्करीत सहभाग तसेच त्यांचे राष्ट्रीयत्व तपासले जात आहे.
या कारवाईदरम्यान सुमारे ७०० ग्रॅम कोकेन, ३०० ग्रॅमपेक्षा जास्त एमडी, ३०० किलो ट्रामाडॉल हायड्रोक्लोराईड जप्त करण्यात आले. आतापर्यंत जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत रुपये २ कोटी रुपये आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलीस अमली पदार्थ प्रतिबंध विभागाने केली आहे, अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.