मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये २० कोटी रुपये किंमतीचे कोकेन सापडले. याप्रकरणी नैरोबी येथून आलेल्या परदेशी महिलेला डीआरआयने अटक केली असून तिच्याविरोधात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परदेशी महिला कोकेन घेऊन मुंबईत येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे नैरोबी येथून आलेल्या लकी नावाच्या महिलेला विमातळावर थांबवण्यात आले. तिच्याकडील बॅगांची तपासणी केली असता त्यात शॅम्पूच्या दोन बाटल्या सापडल्या. शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये १९८३ ग्रॅम चिकट द्रवपदार्थ आढळून आला. त्यामुळे या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चाचणीत या चिकटद्रव पदार्थात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. महिलेने मोठ्या शिताफीने शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये कोकेन लपवले होते. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत सुमारे २० कोटी रुपये आहे. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. महिला सध्या न्याायलयीन कोठडीत असल्याची माहिती डीआरआयकडून देण्यात आली.