पुणे : जगाच्या पाठीवर कोठेही राहायला गेले तरी दिवाळीतील फराळाच्या बाबतीत तडजोड करता येणार नाही, ही मानसिकता आणि उत्साहामुळे पुणेकरांच्या कुरिअर कंपन्यांकडे सध्या फेऱ्या वाढल्या आहेत. परदेशात राहणाऱ्या मुलांना, नातवंडांना आणि नातेवाइकांना दिवाळीत फराळाचा आनंद देणाऱ्या कुरिअर सेवेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनसह युरोपमधील सर्व इतर लहान मोठ्या देशात फराळाची वाहतूक सुरू झाली आहे. दिवाळी सुरू होण्यास अवघा आठवडा राहिल्याने कुरिअर कंपन्यांमध्ये फराळाची पार्सल पाठविण्याची लगबग सुरू आहे. गेल्या काही वर्षात शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने पुण्यातून परदेशात गेलेल्या नागरिकांची, तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक कुटुंब तिकडे स्थायिक झाली आहेत. या सर्व भारतीयांकडून तेथे दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यामुळे पुण्यातील त्यांचे कुटुंबीय आवर्जून दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी फराळ पाठवतात. खाद्य पदार्थांबाबत देशनिहाय असलेले निर्बंधही गेल्या काही वर्षांत शिथिल झाले आहेत. त्यामुळे फराळ पाठविणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या वर्षीत फराळ पाठवण्याचा खर्च वाढला आहे; पण पाठवणाऱ्यांची संख्या कायम आहे.
परदेशाबरोबरच देशांतर्गत फराळ, भेटवस्तू पाठविण्याचे प्रमाणही वाढले आहे. ‘टपाल विभागाने सलग दुसऱ्या वर्षी परदेशात फराळ पोहचविण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांकडून फराळाचे पदार्थ घेऊन पोस्टाचे कर्मचारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियमांनुसार पॅकिंग करून देत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहून यावर्षी शहरातील जिल्हा पोस्ट ऑफिस, पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केट यार्ड, पर्वती व इतर मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये फराळाच्या पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसवली आहेत,’ अशी माहिती पुणे टपाल विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये सांगितले. अमेरिका, ब्रिटन, युरोपमधील देश, ऑस्ट्रेलिया, काही आखाती देशांना विविध देशांध्ये आम्ही काळाच कुरिअर पाठवत आहोत. देशनिहाय खाद्य पदार्थांवर काही बंधने आहेत, पण दिवाळीच्या फराळाला बहुतांश वेळी काही अडचण येत नाही. ग्राहकांनी आणलेले पदार्थांचे आम्ही उत्तम पॅकिंग करून देतो. या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे कुरिअरचे दर वाढले आहेत, तरीदेखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.