नवी मुंबई : तळवळी येथील चायनिज दुकानात काम करतानाच अमली पदार्थाची विक्री करणारया एका व्यक्तीला अमली पदार्थ विरोधी पथकाने गस्ती दरम्यान अटक केली आहे. मयुर तानाजी सुपुगडे (३०) असे या व्यक्तीचे नाव असून अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्या ताब्यातून अडीच लाख रुपये किंमतीचा १० ग्रॅम वजनाच्या हेरॉईन या अमली पदार्थाच्या ६७ पुड्या जप्त केल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडू व व त्यांचे पथक गस्त करण्यासाठी बाहेर पडले होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अमली पदार्थ विरोधी पथक नोसील नाका येथून तळवली गावाकडे जात असताना, तळवली गाव येथील जय भवानी चायनिज सेंटरमध्ये एक व्यक्ती तेथे येणारया लोकांना छोटी पुडी देऊन त्यांच्याकडुन पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले.
सदर व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करत असल्याचा संशय आल्याने अमली पदार्थ विरोधी पथकाने तत्काळ सदर ठिकाणी छापा मारुन संशयास्पद पुड्या विकणाऱ्या मयुर तानाजी सुपुगडे याला ताब्यात घेतले. यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्या खिशामध्ये सुमारे अडीच लाख रुपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाच्या हेरॉईनच्या ६७ पुड्या आढळून आल्या. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने मयुर सुपुगडे याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ सापडलेले हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त केले. यावेळी मयुर सुपुगडे याच्याकडे अमली पदार्थबाबत चौकशी केली असता, तो चायनिज दुकानामध्ये कामाला असल्याचे व त्याचा मालक विक्रमसिंग चरण याने त्याला हेरॉईन हे अमली पदार्थ विक्रीकरीता त्याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने मयुर सुपुगडे याच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.