मुंबई : गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर किंवा पदपथावर खड्डे खणल्यास सार्वजनिक मंडळांना यंदा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. प्रति खड्डा तब्बल पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे. आतापर्यंत प्रति खड्डा दोन हजार रुपये दंडाची रक्कम असताना एकदम त्यात सात पट वाढ केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. पीओपीच्या मुर्तींचा न्यायालयीन वाद संपून त्यावर तोडगा निघत नाही तोच गणेशोत्सवाशी संबंधित आणखी एक वाद उफाळून आला आहे. गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्याकरीता मुंबई महापालिकेने यंत्रणा सुरू केली आहे. तसेच मंडळांसाठी मार्गदर्शक सूचनाचे परिपत्रकही काढले आहे. त्यात खड्ड्यांबाबतची सूचना देण्यात आली आहे.
मुंबईत सुमारे दहा ते अकरा हजार सार्वजनिक मंडळे असून त्यापैकी दोन ते तीन हजार मंडळे ही रस्त्यावर किंवा पदपथावर मंडप उभारून उत्सव करतात. या मंडळांना पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरीता मंडळे जेव्हा पालिका विभाग कार्यालयांकडे अर्ज करतात तेव्हा मंडळांना अनामत रक्कम भरावी लागते. २० ते ४० हजारापासून लाखो रुपयांपर्यंत ही अनामत रक्कम असते. मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर जे खड्डे खणले जातात ते मंडळांनी बुजवावे म्हणून ही रक्कम घेतली जाते. मंडळांनी खड्डे बुजवल्यास ही रक्कम मंडळांना परत केली जाते. खड्डे महापालिकेला बुजवावे लागले तर त्याचा खर्च या रकमेतून वजा केला जातो. अशी आतापर्यंतची पद्धत होती. यंदा मात्र महापालिकेने मंडपासाठी खड्डे खणण्यास मनाई केली आहे. खड्डा खणल्यास प्रति खड्डा १५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. मोठ्या व सुप्रसिद्ध मंडळांचे मंडप मोठे असतात. त्यामुळे त्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.







