वसई : मिरा रोड येथील नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेनेही ही नियमित कारवाई असल्याचे सांगितले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणार्यांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी मीरा रोडच्या नया नगर परिसरात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यासंदर्भात अशा प्रवृत्तींच्या लोकांवर कारवाई केली जाईल, त्यांची अतिक्रमणे पाडण्यात येतील असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळपासूनच पालिकेने कारवाईची तयारी केली होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विरोदी कारवाई सुरू करण्यात आली. ही नियमित कारवाई असल्याचे उपायुक्त मारूती गायकवाड यांनी सांगितले. मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. आमच्याकडे पालिकेने बंदोबस्त मागितला होता. तो आम्ही दिला असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी सांगितले.