मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग, अभ्यासाचा ताणतणाव, घरापासून दूर असल्याने येणारा तणाव असे विविध प्रश्न वैद्यकीय विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. यातूनच आता वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी आयोगाकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे होणारे रॅगिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग विविध प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आयोगाने रॅगिंगविरोधी कक्षाची स्थापना केली आहे. रॅगिंगविरोधी कक्षाने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची माहिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रॅगिंगविरोधी कक्षाने राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांचे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी व प्राध्यापकांची ओळख तसेच त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
सर्वेक्षणामध्ये मिळालेली माहिती केवळ विश्लेषण आणि अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक शिफारशींसाठी वापरण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाईन सर्वेक्षण करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून गूगल लिंक तयार करण्यात आली आहे. ही लिंक देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना पाठविण्यात येणार आहे. तसेच ही लिंक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये ३ मे २०२४ पर्यंत विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, अशी सूचना राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आली आहे.