मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आतापर्यंत ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील १४,७१६ मीटर लांबीचे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी बंद केलेले रस्ते एमएमआरसी येत्या १५ दिवसांत मोकळे करणार आहे. हुतात्मा चौक, वरळी, दादर आदी भागांतील हे रस्ते असून त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामाला २०१६ पासून सुरुवात करण्यात आली असून ही मार्गिका भुयारी असली तरी या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता रोधक उभे करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आता मात्र मागील एक-दीड वर्षांपासून एमएमआरसीने हळूहळू रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत १४,७१६ मीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. आता दक्षिण मुंबईतील कामे वेगाने सुरू आहेत. कामे पूर्ण झालेल्या ठिकाणचे रस्ता रोधक हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. त्यानुसार येत्या १५ मेपर्यंत हुतात्मा चौक, वरळी आणि दादरमधील रस्ता रोधक हटवून रस्ते मोकळे करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मागील कित्येक वर्षांपासून मेट्रो ३ च्या कामासाठी दादरमधील शिवसेना भवन, शीतला देवी आणि माहीम येथील रस्ते बंद आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांचीही मोठी अडचण होत आहे. हीच परिस्थिती वरळीतील सायन्स म्युझियम आणि हुतात्मा चौक येथे आहे. पण आता लवकरच वाहनचालक, पादचाऱ्यांची यातून सुटका होणार आहे. हुतात्मा चौक, सायन्स म्युझियम, शिवसेना भवन आणि शीतला देवी येथील रस्ता रोधक १५ मेपर्यंत हटविण्यात येणार आहेत.