मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या बसमधून प्रवास करताना विनातिकीट प्रवासीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. महसूल बुडवणाऱ्या विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत १४ जानेवारीपर्यंत १२ हजार विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. दररोज ६०० हून अधिक प्रवाशांना पकडण्यात येत आहे. मोहिमेत केलेल्या दंडात्मक कारवाईतून एकूण ७ लाख ४६ हजार ५६७ रुपये महसूल वसूल करण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २ हजार ९१६ बस असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टचे एसी प्रवासाचे पाच किमीपर्यंतचे तिकीट सहा रुपये आणि विनावातानुकुलित बसचे पाच रुपये आहे. तरीही अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करण्याचे धाडस करतात. मात्र तिकीट तपासणीच्या जाळ्यात हे प्रवासी अडकतात. अशा विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १ जानेवारी २०२४ पासून विशेष मोहीम घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. १ जानेवारीला ९६८, तर २ जानेवारीला ९४५ विनातिकीट प्रवाशांची धरपकड केली होती. ४ जानेवारीला सर्वाधिक १ हजार ३१ विनातिकीट प्रवासी तिकीट तपासनीसांच्या जाळ्यात अडकले होते. १४ जानेवारीपर्यंत एकूण १२ हजार १०४ विनातिकीट प्रवाशांना पकडल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. यासाठी तिकीट तपासनीसांनी ४ हजार ७३४ तपासण्या केल्या. बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेल्या प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रक्कमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येतो. दंड भरण्यास नकार दिल्यास मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम अन्वये एक महिन्यापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची किंवा २०० रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. विनातिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून १२ हजार १०४ रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपक्रमाने दिली.