मुंबई : क्रेडिटकार्डवर दंडाची भीती दाखवून ४६ वर्षीय व्यावसायिकाची सुमारे एक लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. याबाबत तात्काळ तक्रार केल्यानंतर दहिसर पोलिसांनी सर्व रक्कम परत मिळवून दिली. आरोपीने क्रेडिटकार्डच्या साह्याने ॲमेझॉनवरून वस्तू खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. दहिसर पूर्व येथे वास्तव्यास असलेले निमेल वसंतभाई गांधी (४६) यांना ४ डिसेंबर रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांवरून दूरध्वनी आला होता. तुमच्या खासगी बॅकेच्या क्रेडीट कार्डवर दंड आकारण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड बंद न केल्यास तुम्हाला दरमहा २ हजार ७०० रुपये भरावे लागलीत, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे गांधी यांनी क्रेडिटकार्डची सर्व माहिती त्या व्यक्तीला दिली. त्याचा फायदा घेऊन आरोपीने त्यांच्या क्रेडिटकार्डमधून ९९ हजार ९९९ रुपयांचे व्यवहार केले.
क्रेडिटकार्डमधून व्यवहार झाल्याचा संदेश येताच गांधी यांनी तात्काळ दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश दांडगे व पोलीस उपनिरीक्षक राजेश गुहाडे यांना याप्रकरणी तात्काळ तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी शोध घेतला असता गांधी यांच्या क्रेडिटकार्डमधून ॲमेझॉनरवरून काही वस्तू खरेदी केल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्याची विनंती केली. कंपनीनेही तात्काळ व्यवहार थांबवला. त्यामुळे गांधी यांच्या क्रेडिटकार्डमधून व्यवहार झालेली संपूर्ण ९९ हजार ९९९ रुपयांची रक्कम त्यांना परत मिळाली. रस्ते अपघातातील जखमीला तात्काळ उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. त्या कालावधीला गोल्डन अवर्स म्हणतात. तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर लवकरात लवकर सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पैसे वाचवणे शक्य होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वी सायबर गुन्ह्यांमध्ये बँकेची पडताळणी व अहवाल येईपर्यंत गुन्हा दाखल होण्यातच आठवड्याचा कालावधी लागायचा. त्याचा फायदा घेऊन आरोपी खात्यातील रक्कम काढायचे. पोलिसांच्या हेल्पलाईनवर दूरध्वनी केल्यास तात्काळ फसवणुकीची रक्कम गोठवणे शक्य आहे. त्यासाठी सायबर पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधणे आवश्यक आहे अथवा तात्काळ ऑनलाईन तक्रार करणे आवश्यक आहे. याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार केल्यास फसवणुकीचे पैसे वाचवणे शक्य होते.
कोणती काळजी घ्याल?
- अनोळखी मोबाइल क्रमांकावरून येणारा व्हॉटस् ॲप संदेश किंवा एसएमएसव्दारे प्राप्त प्रलोभनाला प्रतिसाद देऊ नये.
- अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या संदेशातील लिंकवर क्लिक करू नका.
- संकेतस्थळावरून व्यवहार करताना सत्यतेची पडताळणी करा.
- क्रेडिट कार्डबाबतची कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊन नका.