नवी मुंबई : आजच्या काळात नोकरी मिळणे कठीण झाले आहे. कितीही चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेतले तरी नोकरी मिळणे हा नशिबाचा भाग असंच समजले जाते. मात्र, शिक्षण घेऊनही वणवण फिरून नोकरी मिळत नाही तेव्हा अनेक वेळा वेगवेगळ्या आमिषाला बळी पडणारे नागरिक पाहायला मिळतात. नोकरी मिळेल या आशेने अनेक वेळा वाटेल तेवढे पैसे भरून नोकरी मिळेल या आशेवर कुठूनही पैसे जमा करून पैसे भरतात. मात्र, अनेकांची यामध्ये फसवूनक होत असल्याचे समोर येत आहे अशीच एक घटना नवी मुंबई मध्ये देखील घडली आहे.
चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सानपाड्यामध्ये राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीकडून तब्बल ७ लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आणले आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी सायबर गुन्हेगाराच्या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आशुतोष बिष्ट असे आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या आशुतोषने जून महिन्यात एका कंपनीस आपली माहिती पाठवून दिली होती. त्यानंतर काही दिवसातच सायबर गुन्हेगारांच्या टोळीने नोकरीसाठी निवड झाल्याचा ईमेल आशुतोषला पाठवून दिला होता. मात्र, त्याला प्रथम पीएमपी नावाचा कोर्स करावा लागेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी व १ लाख ६० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर पगार मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर कोर्ससाठी लागणारी ४८, ६४० रुपये व नोकरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्याच्याकडून मागून घेतली.
तसेच या सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सिक्युरिटी डिपॉझिट, वैद्यकीय कारणांसाठी व कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आशुतोषकडून वेगवेगळी रक्कम उकळली. अशा पद्धतीने त्याच्याकडून तब्बल ७ लाख रुपये उकळल्यानंतर सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील सदस्यांनी मोबाईल फोन बंद केले. त्यांच्याकडून ईमेलद्वारे कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने आपली फसवणूक झाल्याचे आशुतोषच्या लक्षात आल्यानंतर त्याने सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे