ठाणे : शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सायबर टोळीने ठाण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल एक कोटी ७१ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोळीने अगोदर शेअर्सच्या किंमती कमी दाखवल्या. नंतर, किंमती वाढवत २० कोटी नफा झाल्याचे भासवत व्यावसायिकाला फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे, व्यावसायिकाने घेतलेल्या शेअर्सच्या किंमती प्रत्यक्षात वेगळ्या होत्या. अशा प्रकारे आणखी एका व्यक्तीची दीड कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाली असून, फसवणूकप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोडबंदर भागात वास्तव्यास असलेला या व्यावसायिकाची आयुर्वेदिक वस्तूंची एजन्सी असून, ते शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करतात. मोबाइलवर शेअर मार्केटसंबधित व्हिडीओ पाहत असताना, त्यांनी एका लिंकवर क्लिक केले. त्यानंतर ते आपोआप एका व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडले गेले. या ग्रुपमध्ये अन्य सदस्यही होते. हे सदस्य त्यांना शेअर मार्केटमध्ये झालेला नफ्याची माहिती देत होते.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवल्याने या व्यावसायिकाने संबधितांशी पुढे बोलणे चालू ठेवले. या संभाषणानंतर व्यावसायिकाला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून या ॲपमध्ये पैशाची गुंतवणूक करण्याविषयी सांगितले. याविषयी सायबर टोळीतील सदस्य वारंवार त्यांना संपर्क करत होते. अखेर व्यावसायिकाने १ कोटी ७१ लाखांची शेअर्समध्ये गुंतवणूक केली. या टोळीने अगोदर शेअर्सच्या किंमती कमी दाखवल्या. नंतर त्यांनी किंमतीमध्ये वाढ केली. गुंतवलेली रक्कम काढण्यासाठी व्यावसायिक संबधित ॲपमध्ये गेल्यानंतर आरोपींनी त्यांना २० कोटीचे २० टक्के भरण्यास सांगितले. याबाबत संशय आल्याने व्यावसायिकाने शेअर्सची रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पैसे निघाले नाहीत. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिस ठाण्यात तक्रार केली. ठाण्यातील आणखी एका व्यक्तीची देखील अशाप्रकारे १ कोटी ७१ लाख १३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे.