पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात अखेर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. गुन्हे शाखेने दोन संशयितांना नागपूर मधून ताब्यात घेतले तसेच बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटातील मोबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आले. पुणे शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरातील ४० गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावातील ढाबे, दारूविक्रेते, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या आहेत. ग्रामीण पोलिसांच्या सासवड, राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली.