पुणे : बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एका पिस्तुल व एक काडतुस जप्त करण्यात आले आहे. सज्जन सुनिल जाधव (वय १९, रा. डांगे चौक, पिंपरी गांव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अमोल रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पेंद्र चव्हाण, राहुल शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुन्हे शाखेकडून सराईतांची झाडाझडती घेतली जात आहे. दोन दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पोलीस हवालदार उज्वल मोकाशी यांना एकजण हा पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांना याबाबतची माहिती देण्यात आली. यानूसार पथकाने डायसप्लॉट येथे कॅनॉल जवळ सापळा रचला. सायंकाळी सहाच्या सुमारास पथकाने जाधव याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व एक काडतूस मिळाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्म ॲक्टचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याने हे पिस्तूल कोठून आणले व कशासाठी आणले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.





