मिरारोड : मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट– ४ च्या पथकाने तेलंगणा राज्यातील चेरापल्ली येथे एका मोठ्या ड्रग्स कारखान्यावर कारवाई करत ती उध्वस्त केली आहे. पोलिसांनी केलेली कारवाई ही आतापर्यंत सर्वात मोठी ड्रग्स कारवाई आहे. तर एम.डी. ड्रग्स बनविण्यासाठी लागणारे ३२ हजार लिटर केमिकल, १ हजार किलो पावडर, त्यात कच्चा माल आणि एम.डी. ड्रग्स यांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १२ हजार कोटी असल्याची सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे ड्रग्स माफीयांचे कंबरडे मोडले आहे. तर आतापर्यंत १२ जणांना सदरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या ड्रग्स फॅक्टरीच्या कारवाई बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत शुभेच्छा देत कारवाईची प्रशंसा केली आहे. सदरील ड्रग्स फॅक्टरी कारखान्यात व वितरकांमध्ये अंडरवर्ल्ड गँग संबंधी लोकांचा समावेश असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत ८ ऑगस्ट रोजी एक परदेशी महिलेला १०५ ग्राम एम.डी. ड्रग्स विकताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर मुंबईच्या दहिसर येथून त्यांच्या वितरक साथीदारांना अटक केली होती. त्यात २१ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.त्यानंतर लगेच पोलिसांनी साथीदारांकडून २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल मिरारोड आणि दहिसर येथून जप्त केला होता. असा एकूण १७८ ग्राम मेफेड्रोन (एम.डी.) हे अंमली पदार्थ जप्त केला होता. पोलिसांनी आतापर्यंत सदरील गुन्ह्याच्या तपासात १० ड्रग्स वितरक आरोपींना अटक केली होती . त्यानंतर पोलीस तपासात समोर आलेला ड्रग्ज तेलंगणा राज्यातील हैद्राबाद नजीकच्या चेरापल्ली औद्योगिक वसाहतीत केमिकल फॅक्टरीमध्ये बनत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडा आणि त्यांच्या पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन केलेल्या तपासात आरोपी श्रीनिवास विजय वोलेटी व त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी यांच्यासह प्लॉट क्रमांक १९३ फेस क्रं. ५, चेरापल्ली, नवोदय कॉलनी, तेलंगणा राज्य या ठिकाणी अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणाहून ५ किलो ७९० ग्रॅम वजनाचे एमडी अमली पदार्थ तसेच अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारे ३५ हजार ५०० लिटर रसायन आणि ९५० किलो पावडर व इतर साहित्यही मिळून आले आहे. त्यापासून बनणार्या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १२ हजार कोटींची आसपास आहे. आतापर्यंत सदरील गुन्ह्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ह्यात कारवाईत केमिकल तज्ञ यांना अटक करण्यात आली आहे. तर सदरच्या दोन कंपन्या केमिकल वितरक असून त्या त्यापैकी एक शासनाकडे नोंदणीकृत आहे. त्यातून विविध ठिकाणी केमिकल पुरवठा होत होता. तर ड्रग्स कारखान्याचा मालक हा उच्च शिक्षित असून तो बीएसी कॉम्पुटरची पदवी घेतलेली आहे, त्याच्यावर यापूर्वी एक केंद्र शासनाच्या अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एन. सी.बी.) यांच्याकडे एक गुन्हा दाखल आहे. तर तयार केमिकलचा माल आणि कच्चा माल राज्यात वितरित होत होता. तर त्यापासून बनणारे ड्रग्ज हे मुंबईसह कोकण प्रांतात वितरत होते.
पोलिसांनी आतापर्यंत ५ किलो ९६८ ग्राम एमडी ड्रग्स जप्त केला आहे.त्याशिवाय २७ मोबाईल फोन, तीन चारचाकी वाहने , एक मोटार सायकल, चार इलेक्ट्रिक वजन काटे, एमडी बनवण्याचे साहित्य, एमडी अंमली पदार्थ बनण्यासाठी वापरण्यात मुद्देमाल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा ४ चे पोलीस निरीक्षक प्रमोद प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदिप शिंदे, श्रीमंत जेथे व त्यांच्या पथकाने केली आहे.







