बदलापूर : बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. तर दुसरीकडे चिमुकलींचा अत्याचार झालेल्या संबंधित शाळेच्या संस्था चालकांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याबाबत मंगळवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यात बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना आता मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. ट्रस्टींचा कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे.
बदलापूर येथे ऑगस्ट महिन्यात एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाला होता, ज्या शाळेत हा किळसवाणा प्रकार घडला, त्या शाळेचे अध्यक्ष आणि विश्वस्तांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी मंगळवारी १ ऑक्टोबरला सुनावणी झाली. बदलापूर घटनेनंतर पोलिसांनी संस्था चालकांविरोधात देखील पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र पोलीस अद्याप ट्रस्टींना अटक केलेली नाही. ट्रस्टींची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे.