मुंबई : देशात नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात नोटबंदीची घोषणा केली. या निर्णयानुसार, त्या रात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या. नोटबंदीमागचा प्रमुख उद्देश काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटांवर लगाम घालणे आणि देशातील भ्रष्टाचार कमी करणे हा होता. पण नोटाबंदीच्या निर्णय़ानंतरही देशात काळ्या पैशांचे व्यवहार, बनावट नोटा छापण्याची कामे सुरूच असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणि भिंवडीत बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू ठरत असल्याचा खुलासा केला आहे.
आज (१६ जुलै) विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तर दिले आहे.”नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा विळखा कायम असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. पुणे आणि भिवंडी हे बनावट नोटा छापण्याची केंद्र ठरत आहेत. राज्यात विशेषतः पुणे आणि भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांची छपाई होत आहे. त्यामुळे राज्याला बनावट नोटांचे नेटवर्क रोखण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची निर्मिती होत असून पुणे आणि भिवंडी हे बनावट नोटा छापण्याचे हॉटस्पॉट झाले आहे. साल २०२० पासून आजपर्यंत राज्यात बनावट नोटांशी संबंधित एकूण २७३ गुन्हे दाखल झाले असून, याप्रकरणी ५६६ जणांना अटक करण्यात आली आहे. हे गुन्हे प्रामुख्याने पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि भिवंडी परिसरात नोंदवले गेले आहेत. कारवाईदरम्यान पोलिसांनी एक कोटी चाळीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणावरून राज्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचे जाळे कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारपुढे आता हे बनावट चलन रोखण्याचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे.







