मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये करोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलेय. दोन्ही शहरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या लाटेचा धोका निर्माण झालाय. त्यातच आता मुंबईमधूनही चिंतेची बातमी समोर आलेली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये संशयित करोनाबाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही रूग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या इतर आजारांमुळे झाल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण दोन रूग्णांच्या मृत्यूनंतर प्रशासन अलर्ट झालेय. मृत झालेल्या दोन्ही रूग्णांना कोरोनाची लक्षणे दिसत होती, त्यामुळे केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण उपचारावेळीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या भीतीने चिंता निर्माण झाली आहे. केईएम रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे होती. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, त्यांचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. संशयित दोन्ही कोरोना रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही, असे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मुंबई महानगरपालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तसेच, नागरिकांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि हात धुणे यासारख्या गोष्टी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. हेल्थ अपडेट दिल्यानंतर शिल्पा यांचे चाहते चिंतेत आहेत. हिंदी बिग बॉस १८ मध्ये शिल्पा शिरोडकर झळकल्या होत्या. भारत-पाकिस्तान तणावानंतर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. स्थगितीनंतर १७ मे रोजी आयपीएलला पुन्हा सुरुवात केली. सनरायजर्स हैदराबाद संघाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोव्हिड-१९ ची लागण झाली आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर तो मायदेशी म्हणजेच ऑस्ट्रेलियाला परतला होता. तेव्हा हेडला करोनाची लागण झाली.







