मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत भाजपच्या भूमिकेत सोयीनुसार बदल झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
मंगळवारी विधानसभेत एसटी महामंडळावरील एका प्रश्नावर चर्चा होत असताना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य शासनाची भूमिका काय, असा उपप्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, ते नवी दिल्लीला गेलेले असल्याने त्यांच्यावतीने एसटी संदर्भातील प्रश्नांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे उत्तरे देत होते. मात्र, अशोक चव्हाण यांनी थेट उपप्रश्नाला दादा भुसे यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पुन्हा एकदा विचारणा करून राज्य सरकारच्या भूमिकेत स्पष्टता आणण्याची मागणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून याबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार महाविकास आघाडीने जी भूमिका घेतली होती, तीच आमची भूमिका असल्याचे उत्तर दिले.
त्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या भूमिकेत सोयीनुसार बदल होत असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षातील भाजप नेत्यांनी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने याविषयी घुमजाव केल्याचे ते म्हणाले.