मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेवरून गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला. त्यातही सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत या मार्गावरून जाणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त होती. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका १२ मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली. बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या मार्गाबाबत मुंबईकरांना प्रचंड उत्सुकता होती. या मार्गावरून सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत वाहतूक सुरू असते. तसेच शनिवारी आणि रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असतो. दुसऱ्या मार्गिकेच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येतो.
आतापर्यंत या मार्गिकेवरून तब्बल २ लाख २५ हजार ५५८ वाहनांनी प्रवास केला. यामध्ये सकाळी १० नंतर वाहनांची संख्या सर्वाधिक असते. सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत सर्वाधिक वाहने या मार्गावरून जातात. नंतर पुन्हा दुपारी ३ ते ४ या वेळेतही वाहनांची संख्या अधिक असते. सागरी किनारा मार्गावर येण्यासाठी वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक आणि भुलाबाई देसाई रोड येथून प्रवेश करता येतो. तसेच अमरसन्स उद्यान, भुलाबाई देसाई रोड आणि मरिन ड्राईव्ह येथे बाहेर पडण्यासाठी मार्ग आहेत. तीन प्रवेशमार्ग असल्यामुळे बोगद्यातून मरिन ड्राईव्ह येथे बाहेर पडणाऱ्या वाहनांची मोजणी करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. सागरी किनारा मार्गावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवेश दिला जात आहे. मात्र, वरळी सी फेस परिसरातील बिंदू माधव ठाकरे चौकातील प्रवेश मार्गावर संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. संध्याकाळच्या वेळी उपनगरात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे वरळीतील या प्रवेशमार्गावरून संध्याकाळी ५ पर्यंतच प्रवेश दिला जातो.