मुंबई : डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने नुकतेच अंदाजे ५ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. कोस्टारिका देशातून लाकडी शोपीसमध्ये अमली पदार्थ लपवून कुरिअर द्वारे मुंबईत पाठवण्यात आले. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकाना अटक करण्यात आली आहे. तपासाअंती बनावट पत्ते आणि बनावट मोबाईल क्रमांकाचा वापरून अमली पदार्थ आयात केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कुरिअर टर्मिनलवर ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कुरिअर प्राप्तकर्त्या व्यक्तीच्या नावाने दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला.
पलीकडे एका मुलीने फोन कॉलला उत्तर दिले आणि पार्सलबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर केव्हायसी दस्तऐवजावर सूचीबद्ध केलेल्या मोबाइल नंबरवर अधिकाऱ्यांनी दुसरा कॉल केला. कॉल स्विकारणाऱ्या व्यक्तीला पार्सलबद्दल विचारले असता त्या व्यक्तीने पार्सलच्या मालकीचा दावा केला. या माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांकडून सापळा रचण्यात आला. अमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या आरोपी पार्सल पोहोचवण्याच्या निमित्ताने पकडण्यात आले. आरोपीची चौकशी केल्यावर आरोपीने अमली पदार्थ पुरवठा साखळीत सामील असलेल्या दुसर्या तस्काराबद्दल माहिती दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही आरोपीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह पुरावे सापडले आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून सध्या ते डीआरआईच्या कोठडीत आहेत. अमली पदार्थांची पुरवठा साखळी उलगडण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.