ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईच्या समस्या निर्माण झाली असतानाच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. पावसाळा सुरू होईपर्यत तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशसानाने ठाणेकरांना केले आहे. असे असतानाच, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, कटाई नाका ते ठाणे या दरम्यान गुरूवार, २४ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.







