ठाणे : जादा पैशांचे अमिष दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणार्याला एकाला ठाणे पोलीसांनी अटक केली. संजय कुमार भारती (४१) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे ५०० रूपयांचे ३६० बंडल (प्रत्येक बंडलमध्ये १०० नोटा), ३८ बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्दे माल जप्त केला आहे.
ठाण्यात राहणार्या एका तरुणाला एका व्यक्तीने संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास पुढील तीन आठवड्यात तीन लाख रुपये मिळतील अशी बतावणी केली होती. तरुणाला संशयास्पद वाटल्याने त्याने याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलीसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. बनावट नोटा घेऊन आरोपी हे ३ नोव्हेंबरला साकेत-बाळकूम मार्गावर येणार असल्याने पोलीसांनी सापळा रचला. त्यानंतर पथकाने संजय कुमार भारती याला ताब्यात घेतले. परंतु त्याचा साथिदार तेथून पळून गेला. पोलीसांनी घटनास्थळावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे ५०० रूपयांचे ३६० बंडल, ३८ बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा तपास पोलीसांकडून सुरू आहे.







