पालघर : पालघर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आता थेट प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी हुतात्मा चौकात एकत्र येऊन नागरिकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनातून पालघरकरांनी आपल्या कररूपी पैशातून होणारा भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यावर तीव्र शब्दांत टीका केली.
‘मी जबाबदार पालघरकर’ या मोहिमेअंतर्गत शहरातील सामाजिक कार्यकर्ते निशांत धोत्रे आणि हिमांशू राऊत यांच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. पालघर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत आहेत, तर वाहतूक कोंडी ही एक नित्याची समस्या बनली आहे. जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी नागरिकांनी खड्डेमय रस्त्यांवरच पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्रासदायक प्रवास यांची व्यथा मांडली. तसेच ‘खड्डेमुक्त पालघर’च्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.







