पनवेल : मेट्रो प्रवाशांच्या मागणीनंतर सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ केली आहे. सोमवारपासून वाढीव वेळेनुसार मेट्रो धावणार आहे. वाढलेल्या वेळेनुसार बेलापूर मेट्रोस्थानकातून एक तास तर पेणधर मेट्रो स्थानकातून अर्ध्या तासाची वेळ वाढवण्यात येणार असल्याचे सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाने जाहीर केले. साडेचार महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदीनी (ता.१७ नोव्हेंबर) नवी मुंबई मेट्रोची पहिली मार्गिका बेलापूर स्थानक ते पेणधर या पल्यावर धावली. रात्री १० वाजेपर्यंत अखेरची मेट्रो धावत असल्याने हार्बर मार्गे तळोजात येणाऱ्या प्रवाशांना खारघर रेल्वेस्थानकाबाहेरुन खासगी रिक्षा अथवा इको व्हॅनने प्रवास करावा लागत होता. या परिसरात पथदिवे अनेक ठिकाणी नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक होता. मागील साडेचार महिन्यात साडेचार लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे.
सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासमोर प्रवाशांची वाढीव वेळेची मागणी ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने ही मान्य केल्याने प्रवाशांना आता रात्री अकरा वाजेपर्यंत बेलापूर ते पेणधर या मार्गावर सूरक्षित प्रवास करता येणार आहे. मेट्रोच्या प्रवाशांची प्रवासी दर भाडे कमी कऱण्याची मागणीविषयी सिडकोने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. नव्या वेळापत्रकानूसार बेलापूर मेट्रो स्थानक येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत एक तासांची तर पेणधर मेट्रो स्थानकातून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात येणार आहे. आठवड्यातील सर्व दिवशी वाढीव सेवा वेळेनुसार मेट्रो धावणार आहे. नवी मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक १ बेलापूर ते पेणधर या पल्यावर धावणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेमध्ये वाढ केल्यानंतर बेलापूर मेट्रो स्थानक येथून सकाळी सहा वाजता पहिली मेट्रो पेणधरच्या दिशेने व पेणधर येथून बेलापूरच्या दिशेने रवाना होईल. बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री अकरा वाजता पेणधरच्या दिशेने रवाना होईल तर पेणधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री साडेदहा वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल.