ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकास करतोय. कोणत्याही जाती – धर्मातील व्यक्तीला आम्ही विकासापासून लांब ठेवणार नाही. काँग्रेसला जे ६० वर्षांत करता आले नाही, ते नरेंद्र मोदींनी १० वर्षांत केले. त्यामुळे बोगस मतदानाची आम्हाला गरज नाही. उद्धव ठाकरे तोंडावर कधीच आपटलेत. आता त्यांचे तोंड फुटेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर विरोधकांचा समाचार घेतला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व जागा महायुती जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्युन आयटी पार्कमधील मतदान केंद्रामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन मतदान केले. मतदानानंतर त्यांनी प्रसिद्धिमाध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा, कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
शिंदे म्हणाले की, सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या दूर झाल्याचा दावा शिंदे यांनी केला. बोगस मतदानाच्या विरोधी उमेदवारांच्या आरोपांवर ते म्हणाले, बोगस मतदानाची आम्हाला गरज नाही, ज्यांना पराभव दिसतोय, ज्यांनी हत्यारे टाकली त्यांना असे आरोप सुचतात. युवा पिढी देश घडवणारी आहे. त्यांच्यासाठीच आम्ही काम करतो. युवकांनी बाहेर येऊन मतदान करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. ठाणे, कल्याण, भिवंडी हे युतीचे बालेकिल्ले आहेत. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यातील सर्वच जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.