पुणे : शहरातील ८९ अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सपैकी ७६ हॉटेलांना नोटिसा पाठविण्यात आल्या. त्यापैकी ५३ हॉटेलवर कारवाई केली गेली. सहा हॉटेल मालकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेतले आहे. सात हॉटेलचा वापर बंद झाला आहे. सात हॉटेल मालकांनी कारवाईला स्थगिती मिळविली आहे. नऊ हॉटेलवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमच्या कलम ५२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागात इमारतींच्या टेरेसवर, तसेच सामाईक जागेत शेड उभे करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू राहतात, त्यामुळे या भागातील नागरिकांना त्याचा उपद्रव होतो. पार्किंग, ध्वनिप्रदूषण यासंदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येतात. याची दखल घेत महापालिकेने रूफटॉफ हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव कार चालवून धडक दिली. यात तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही या अपघाताच्या निमित्ताने पब, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या दृष्टीने तपासणी करण्याचे आदेश दिले असून, बॉलर पबच्या पाहणीसाठी देखील पथक पाठविले होते.