मुंबई : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात सहकारी तत्वावर भारत टॅक्सीचे उद्घाटन झाले. मात्र त्यामुळे ओला आणि उबर सारख्या जागतिक कंपन्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे. आता भारत ॲपला टक्कर देण्यात राज्यात लवकरच छावा ॲप सुरू होणार आहे. परिणामी, ॲप आधारित टॅक्सी सेवेत प्रवाशांना विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
ओला आणि उबरसारख्या खासगी ॲप आधारित कंपन्यांकडून जादा प्रवासी भाडे, चालकांना कमी मोबादला, प्रवाशांना योग्य सुविधा पुरवली जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या त्रासातून सुटका करण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी भारत टॅक्सी सुरू करण्यात आली. भारत टॅक्सीमध्ये चालक हेच मालक असतील. ही एक सहकारी संस्था आहे. ओला-उबर सारख्या कंपन्यांमध्ये चालकाला प्रत्येक फेरीसाठी १५ ते ३० टक्के मोबदला कंपनीला द्यावा लागतो. भारत टॅक्सी चालकाला मोबदल्याऐवजी पूर्ण पैसे मिळतील. त्यामुळे चालकांचा यात फायदा होणार आहे. आता उबर आणि ओलाच्या मॉडेल्समध्ये बदल करण्यात येत आहे. परंतु पूर्वी चालक हे भागधारक नव्हते. स्वस्त असूनही यात महिलांसाठी पॅनिक बटन, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि विमा संरक्षण यांसारख्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. यामुळे ही प्रवाशांचे पैसे वाचवणारी भारतीयांची स्वतःची टॅक्सी सेवा असणार आहे.







